Bhagavati Devi
Bhagavati Devi

आमच्याविषयी

kotkamate bhagavati devi

कोकण…..भगवान परशुरामांची पावन भूमी. ईश्वराचा कृपाप्रसाद , अध्यात्मिक अधिष्ठान आणि निसर्गाची मुक्तहस्ते उधळण लाभलेली हि पवित्र भूमी. पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग आणि पश्चिमेला अथांग सागर. या पावन भूमीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, देवगड तालुक्यातील 'कोटकामते' हे एक गाव. चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेले, बारमाही वाहती नदी, सुजलाम सुफलाम असे हे नयनरम्य गाव. ऐतिहासिक आणि आध्यत्मिक अधिष्ठान लाभलेले हे गाव. या गावाची ग्रामदैवत ' देवी भगवती माता'. एक जागृत देवस्थान.

देशभरातील इतर व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने जरी रद्द झाली असली तरी देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे इनाम मात्र अजूनही चालू आहे. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणून इनामदार ‘श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामते’ असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर आहे.

या गावात भुईकोट किल्ला आहे. आजही त्याचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आपणाला पाहायला मिळतात . यावरूनच गावाला 'कोटकामते' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कोटकामते गावातील भगवती देवीस नवस केला होता, ‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी शके १६४७ म्हणजेच इ.स. १७२५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पहायला मिळतो. शिलालेखातील मजकूर पुढील प्रमाणे :
"श्री भगवती ।।श्री।।
मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ।।
सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल
श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ।।१।।"

श्री भगवती देवीची पुरातन मुर्ती काळ्या पाषाणात बनवलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या वरच्या बाजूस २ हत्ती देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खडग आहे. सहा प्रचंड लाकडी कोरीव खांबांनी तोललेली तक्तपोशी, जुन्या घंटा, देवतांचे तरंग, लामणदिवे आणि भगवतीची सर्वागसुंदर मनोहारी मूर्ती असे सगळे साग्रसंगीत सजलेले हे देवालय आहे. अत्यंत जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी अशी हिची ख्याती पंचक्रोशीमध्ये पसरलेली आहे.

मंदिराच्या परिसरात दोन पुरातन मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यास स्थानिक लोक श्री देव रामेश्वर व श्री पावणाई देवी म्हणतात. भगवती मंदिरामागे श्री रामेश्वर मंदिर व श्री देव जटेश्वर मंदिर आहे. त्यात एक पुरातन मूर्ती आहे. याशिवाय पुरातन दुमजली वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात श्रीदेव रवळनाथ मंदिर , श्री देव हनुमान मंदिर , श्री पावणादेवी मंदिर असून लाकडी नक्षीकाम केलेली दीपमाळ, सुंदर कलात्मक बांधणीची एक पाण्याची विहीर या गोष्टी पाहायला मिळतात. विहिरीच्या बाजूला पुजाऱ्यांचे निवासस्थान आणि बाहेर येणाऱ्या भक्तमंडळींसाठी 'भक्तनिवास ' आहे. देवीच्या या देवळाबाहेर मंदिराकडे तोंड करून श्री देवीचे वाहन असलेल्या सिंहाची प्रतिमा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठय़ा तोफा जमिनीमध्ये पुरून ठेवलेल्या दिसतात. बाजूलाच छोट्या पारावर श्री देवी भगवतीचे निशाण उभारण्यासाठी उंच लाकडी ढालकाठी आहे. प्रवेश पायरीसमोर उभे राहिले असता मांडातूनच (देवळासमोरील मोकळा भाग) श्री देवी भगवतीच्या मूर्तीचे मनोहर दर्शन घडते.

किल्ल्याच्या भव्य प्रवेशव्दारापाशी असतो तसा एक छोटा दिंडी दरवाजा मंदिराच्या महाद्वाराला आहे. त्यावर दुमजली बांधकाम आहे. सुमारे ७०० ते ८०० लोक एकाच वेळी बसू शकतील एवढी क्षमता असलेला कोरीव काम केलेले भव्य लाकडी खांब आणि लाकडी महिरपींनी तयार केलेला सभामंडप भाविकांचे लक्ष वेधून घेतो. सभामंडपातून पायऱ्या काढून गेल्यावर आपण गोपुरात जाता येते. येथे आपणाला अत्यंत सुबक, नाजूक नक्षीकाम केलेली भक्कम बांधणीची, गावातीलच सुतार मंडळींनी तयार केलेल्या भव्य पालखीचे दर्शन घडते. गोपुरातील खांब आणि सभामंडप व गोपुरी यांना जोडणाऱ्या भागातील लाकडी नक्षीकाम चित्ताकर्षक आहे. येथून प्रवेश करणाऱ्या दरवाज्याच्या चौपाटीवरील सुंदर नक्षीकाम आणि मध्यभागी कोरलेली श्री गणेशमूर्ती, दोन्हीबाजूला रिद्धी-सिद्धी आणि बाजूला अश्वमुख भाविकांचे लक्ष वेधून घेतात. येथून आत प्रवेश केल्यावर गाभाऱ्यापर्यंतच्या भागात ६ लाकडी खांबांनी तोललेली ,समान भागात विभागलेली सुंदर नक्षीकाम केलेली तक्तपोशी आहे. डाव्या बाजूला अंगात संचार येणाऱ्या चार प्रमुख देवतांचे तरंग नेसवून ठेवलेले दिसतात.

श्री देवी भगवतीमातेचे चमत्कार

तेलाऐवजी पाण्याने मशाल पेटविली

१९७४ साली कोटकामते गावातील आडिवरे वाडी येथील 'श्री वडची देवी' हिची यात्रा होती. या यात्रेस येथील देवस्वारी घेवून मानकरी, गावकरी गेले होते. यात्रेचा दिवस संपल्यानंतर माघारी येण्याच्या वेळी दुपारचे स्नेहभोजन आटोपल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा धूप जाळून श्रींचे तरंग काढण्यात आले. मात्र सर्व धार्मिक विधी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. याठिकाणी निघताना सोबत नेलेल्या सर्व सामानाची भांडी रिकामी झालेली होती. मशालजीकडील तेल संपले असल्याचे लक्षात आल्यानंतर मानकऱ्यांनी हि गोष्ट देवीच्या कानावर घातली. देवीने मानकऱ्यांसोबत मशालजीना व रयतेलाही मी जाईन त्याठिकाणी माझ्यासोबत चला अशी आज्ञा केली. सर्व मंडळी शिवकळेच्या मागून वडची देवी पाषाणाजवळ गेली . ती पाषाणाजवळ गेल्यानंतर तिने ती पेटती मशाल रिकाम्या पासरीत म्हणजेच तेलाच्या भांड्यात बुडवून वर उचलली . आपल्या हातात मशाल घेवून आता माझ्यामागून या अशी आज्ञा केली. देवीच्या आज्ञेप्रमाणे हि मंडळी देवीच्या शेजारी असलेल्या ओहोळाजवळ गेली. तरंग पाण्यात बुडविला व पेटती मशाल पाण्यात बुडवून वर काढली. पाण्यात बुडवूनही मशाल मात्र विझली नाही. ओहोळावरील पाणी पसरीत भरून ती पुन्हा पाषाणाजवळ आली आणि म्हणाली, मी माझ्या दरबारात जाईपर्यंत या पाण्याचा वापर करा. दरबारात गेल्यावर पासरीतील शिल्लक पाणी देवीच्या तळीत नेवून ओतण्यात आले. हि सत्यकथा येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगतात.

कुणकेश्वर भेटीप्रसंगी साक्षात तीर्थ, भगवती देवीच्या भेटीस आले.

काही वर्षापूर्वी कुणकेश्वर यात्रेनिमित देवी भगवतीची देवस्वारी कुणकेश्वराच्या भेटीला गेली होती. भेट झाल्यानंतर तीर्थस्थानावर देवस्वारी जात होती. समुद्रतीर्थावर अनेक देव स्वाऱ्या व भाविक रयतेने गर्दी केली होती. तीर्थापासून १०० ते १५० फुटापेक्षा जास्त अंतरावर देवीची देवस्वारी होती. पण गर्दी असल्यामुळे देवीला तीर्थापर्यंत जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. गर्दीतून मार्ग काढत गावकरी मार्गस्थ होत असताना, देवीने हुकुम सोडला. पुढे जावू नका, मी आहे तिथपर्यंत तीर्थ येईल. अचानक काही वेळेतच तीर्थ देवी ज्या ठिकाणी उभी होती, त्या ठिकाणी आले. हे पाहून सर्व भाविकांना आश्चर्य वाटले. अशा अजूनही अनेक देवीच्या कथा आजही सांगितल्या जातात.

असे हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले 'इनामदार श्री देवी भगवती संस्थान' मंदिर आहे.

विश्वस्त मंडळ - मंदिर समिती 2024-2028

अध्यक्ष

डॉ. मुकुल मुरलीधर प्रभुदेसाई

7350474963

उपाध्यक्ष

श्री. लक्ष्मण गंगाराम पाटकर

8805587808

सचिव

श्री. गुरुदास विश्राम घाडी

9421539484

कोषाध्यक्ष

श्री. तेजपाल राजाराम तांबे

9423513463

विश्वस्त

श्री. महेंद्र विठ्ठल मेस्त्री

8805495584

संस्थान कारकून

श्री संतोष वसंत मेस्त्री

8378010901

देवस्थानचे मानकरी आणि देवसेवक

या संस्थानामध्ये खालील प्रमाणे मानकरी आणि देवसेवक आहेत.

मिराशी, ठाकुरगांवकर, कुलकर्णी, पोकम, घाडीगांवकर, सुतार यांचा उल्लेख प्रत्येक शिवकळा संचारानंतर सभामंडपात आल्यावर करतात. हे मान त्या त्या घरात वंशपरंपरेने पुढे चालु राहतात.

मिराशी अष्टाधिकारी समजला जातो. मंदिरातील नवरात्रोत्सवावेळी तो यजमान पद भूषवितो. एखादे वार्षिक काही कारणास्तव अडले असल्यास त्यात योग्य मार्ग काढण्याची जबाबदारी परंपरेने त्या पदाला दिलेली आहे.

कुळकर्णी हे मेळेकरी असुन लोकांची गाऱ्हाणी शिवकळेच्या कानावर घालण्याचे काम ते करतात. किंबहुना नवरात्रोत्सवातील श्रींच्या संचारासाठी गायली जाणारी आरती, “आनंद उदयो बोला ना अंबे भवानीचा” ही तेच म्हणतात.

पुर्वीच्या काळात ऍडमिनीस्ट्रेटर म्हणुन जमेदार हे पद प्रभुदेसाई घराण्याकडे आहे, देवस्थान घटनेमध्येही याच अनुषंगाने किमान एक विश्वस्त प्रभुदेसाई घराण्यातील असावा असा नियम आहे. बाकी पोकम हे श्री देव जैन आकार ब्राह्मण या स्थानचे वस आहेत, घाडीगांवकर हे श्री देव गांगेश्वर या स्थानचे वस, सुतार हे श्री देव चव्हाटा रवळनाथ याचे वस, तसेच घाडी हे पावणाई देवीचे वस असुन हे सर्व मानकरी वर्सलीप्रमाणे आपापले कामकाज करतात.

संस्थानमध्ये खालीलप्रमाणे देवसेवक आहेत :

  1. श्रींचा पुजारी – ही व्यक्ती ब्राह्मण समाजातील असते. बहुतेक वेळा याच व्यक्तीवर देवीचा संचार होतो. हे पद संस्थान नियुक्त आहे. येथे कोणाचाही वंशपरंपरागत हक्क नाही.
  2. पुराणिक/ग्रामोपाध्याय – ही सेवा सामान्यतः ग्रामोपाध्याय (भटकामतेकर) स्वीकारतात. नवरात्रोत्सवात ही सेवा आजुबाजूच्या गावातील काही ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने करतात. याची नियुक्ती मिराशी ठरवितो.
  3. ब्राह्मणदेव वहिवाटदार – या देवस्थानची सेवा पोकम घराण्यातील व्यक्ती त्यांच्या वरसलीप्रमाणे करतात.
  4. गांगेश्वर वहिवाटदार – भरडवाडीतील घाडीगांवकर समाजातील व्यक्तींकडे या देवस्थानची सेवा असते. ती ते त्यांच्या वरसलीप्रमाणे करतात.
  5. रवळनाथ वहिवाटदार – या देवस्थानची सेवा देवुळवाडीतील मेस्त्री (सुतार) समाजाकडे असते. ती ते त्यांच्या वरसलीप्रमाणे करतात.
  6. पावणाई वहिवाटदार – पलिकडच्या वाडीतील घाडी समाज या देवस्थानची सेवा त्यांच्या वरसलीप्रमाणे करतो.
  7. वडची देवी वहिवाटदार – ही सेवा भरडवाडीतील घाडीगांवकर समाजाकडे असते. ती ते त्यांच्या वरसलीप्रमाणे करतात.
  8. स्थानेश्वर वहिवाटदार – ही सेवा प्रभुदेसाई घराण्यातील व्यक्तीकडे असते.
  9. हेदुबाई वहिवाटदार – या देवस्थानची सेवा खुडी गावातील घाडी समाजाकडे वरसलीप्रमाणे असते.
  10. भुतेश्वर वहिवाटदार – खुडी गावातील या देवस्थानची सेवा जोईल समाजाकडे वरसलीप्रमाणे असते.
  11. खांबदुरी – चार शिवकळांचे चार खांबदुरी आहेत. श्री देवी भगवतीसाठी सध्या श्रींचा पुजारी, श्री देव गांगेश्वरसाठी घाडीगांवकर, श्री देवी पावणाईसाठी घाडी तसेच श्री देव रवळनाथासाठी मेस्त्री कुटुंबातील खांबदुरी म्हणुन नेमणुक करतात.
  12. मशाल – ही सेवा कोटकामते गावातील ठाकूर यांचेकडे आहे.
  13. चोपदार (२) – कोटकामते गावातील म्हसकर आणि पलिकडच्या वाडीतील चव्हाण कुटुंबाकडे ही सेवा असते.
  14. हुद्दा – ही सेवा मेस्त्री समाजातील व्यक्ती करतात.
  15. मोरचिल – पोकम समाजातील व्यक्ती ही सेवा वरसलीप्रमाणे पार पाडतात.
  16. भोई (२) - पालखी वाहून नेण्याची ही सेवा घाडी व मिशाळे दरवर्षी करतात.
  17. नाईक पट्टेवाला – ही सेवा पूर्वी मुस्लीम समाजाकडे होती. त्यामुळे या पट्ट्यावर चांद-बिंदी आहे. त्यानी ती सोडल्यानंतर देऊळवाडीतील कामतेकरांनी ही सेवा स्वीकारली आहे.
  18. उत्सव पट्टेवाला (४) – उभावाडा येथील चुनेकर, रुमडे (आडवलकर), हिर्लेकर कुटुंबातील व्यक्ती ही सेवा नवरात्रोत्सवांत पार पाडतात.
  19. चौरी (४) – आरती सुरू असताना व पालखीसोबत चुनेकर, चव्हाण आणि ठाकूर कुटुंबातील व्यक्ती ही सेवा करतात.
  20. अब्दागिर (२) – ठुकरुल आणि चुनेकर ही सेवा पालखीसोबत पार पाडतात.
  21. हिलाल – कामतेकर (तेली) ही सेवा करतात.
  22. कोठावळा – उत्सवासाठी संस्थानने आणलेले साहित्य उत्सवाला रीतीनुसार पुरविण्याची ही सेवा पारकर कुटुंबीयांनी स्वीकारली आहे.
  23. छत्री – पालखी-प्रदक्षिणेसोबत पालखीवर छत्र धरण्याची ही सेवा मेस्त्री कुटुंबीय करतात.
  24. घाम पुसणे – नवरात्रात देवीचा संचार असलेल्या व्यक्तीचा घाम पुसण्याची ही सेवा म्हसकर कुटुंबातील सदस्य करतात.
  25. शंख – आरतीनंतर पालखीसोबत व देवीच्या संचारासोबत शंख फुंकण्याची सेवा नाथ-गोसावी समाजातील व्यक्तीने स्वीकारली आहे.
  26. गस्त – नवरात्रोत्सवाचा त्या त्या दिवशीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कुणी अनोळखी व्यक्ती आजुबाजूच्या परिसरात नाही ना, काही धोका नाही ना याची खात्री करून घेण्याची खात्री करून घेण्यासाठी गस्त घालण्याची ही सेवा मिशाळे कुटुंबीयांनी स्वीकारली आहे.
  27. निशाण (२) – पालखी-प्रदक्षिणेसोबत देवीची निशाणे घेऊन फिरण्याची ही सेवा कोकम आणि कामतेकर (परीट) कुटुंबे करतात.
  28. झेंडा (५) – निशाणासोबत पालखीसोबत देवीचे झेंडेही फिरविले जातात. ही सेवा बागवे, रुमडे, सावंत, मेजारी आणि कामतेकर (परीट), या कुटुंबीयातील व्यक्ती करतात.
  29. मृदंग – पाटकर कुटुंबीय ही सेवा करतात.
  30. झांज – कामतेकर कुटुंबीयांनी ही सेवा स्वीकारली आहे.
  31. कीर्तनकार – नवरात्रोत्सवातील ही सेवा गावातील व गावाबाहेरील नामांकित कीर्तनकार करतात.
  32. पेटीवाला – गावातील व गावाबाहेरील नामांकित कलाकार ही सेवा करतात.
  33. आतषबाजी – पालखी-प्रदक्षिणेच्या वेळी रंगीत फुलबाज्या रंगीत पाऊसासरखी आतषबाजी करणे ही सेवा मेस्त्री कुटुंबीय सांभाळतात. किर्तनावेळी अगरबत्तीचे झाड लावणे हे कामही मेस्त्री कुटुंबिय करतात.
  34. तेल पिळणे – संचार झालेल्या देवीच्या तबकातील काकडे प्रज्वलित ठेवण्यासाठी ही सेवा मेस्त्री कुटुंबीय सांभाळतात.
  35. पासरी – श्रींच्या संचाराला लागणारे तेल पासरीत घेतले जाते त्याची जबाबदारी कामतेकर (तेली) कुटुंबियांकडे आहे.
  36. संपुष्टान – वरीलप्रमाणे तेल पिळण्यासाठी तेलाचे लहान भांडे सांभाळण्याची ही जबाबदारी पलिकडच्या वाडीतील घाडी कुटुंबीयांकडे असते.
  37. आतील रोषणाई –नवरात्रोत्सवात सभामंडपात हंड्या-झुंबरे लावणे, देवालयाच्या आतील भागांत रोषणाई करण्याची सेवा मिशाळे करतात.
  38. बाहेरील रोषणाई – देवालयाच्या बाहेरच्या बाजूने रोषणाई करण्याचे काम घाडीगांवकर सांभाळतात.
  39. देवदास (२) – गर्भगृहातील सफाई आणि गोपुरी आणि सभामंडपातील दररोजची सफाई करण्याची ही सेवा पाटकर बंधु आणि कामतेकर बंधु यानी स्वीकारली आहे. (पूर्वी या कामासाठी देवदासींची नियुक्ति केलेली होती).
  40. उत्सव वाजंत्री – नवरात्रोत्सवातील ही सेवा गावातील शेख कुटुंबीय सांभाळतात.
  41. घटिका – नवरात्रोत्सवात घटिका बुडाली की टोल देऊन सर्व ग्रामस्थांना व देवसेवकांना वेळेची जाणीव करून देण्याची ही सेवा भरडवाडीतील घाडीगांवकर मंडळी करतात.
  42. बरकंदाज –घटकेप्रमाणे कार्यक्रमाची वेळ झाली की बार काढून कार्यक्रमाचे वेळापत्रक संभाळण्याचे काम (सध्या ऍटम- बॉम्ब लावण्याची ही सेवाही) भरडवाडीतील घाडीगांवकर कुटुंबीय सांभाळतात.
  43. महिरप – आगळ्या प्रकारचे मोरपिसे लावलेले हे निशाण पेडणेकर कुटुंबीय सांभाळतात.
  44. श्रींचा रखवालदार – नवरात्रात देवीचे दागिने चढवून झाले की रात्री उत्सव आटोपेपर्यंत त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची ही सेवा भरडवाडीतील घाडीगांवकर कुटुंबीय सांभाळतात.
  45. घडशी –दर वर्षी नित्यनियमाने कराड, बारामतीहून घडशी मंडळी सनई, क्लॅरोनेट व तालवाद्य घेऊन येतात व पान-सुपारीचा कार्यक्रम आटोपेपर्यंत व नंतर देवीचा संचार असेपर्यंत वाद्य-वादनाची सेवा दररोज देतात.
  46. टाळधारी – संचारासोबत टाळ वाजविण्याची ही सेवा कामतेकर (सोनार) करतात.
  47. पालखीला पॉलिश – श्रींच्या पालखीला पॉलिश करण्याचे काम मेस्त्री बंधु करतात, जेणेकरुन त्यायोगे दरवर्षी पालखीची गरजेनुसार डागडुजी केली जाते.
  48. कमळे आणणे – देवीच्या दररोजच्या पूजेसाठी दहिबाव (बागमळा) येथील तळ्यातून सकाळीच कमळे आणण्याची ही सेवा मेजारी कुटुंबीय सांभाळतात.
  49. पंचारती ताटाचे काकडे वळणे व श्रींच्या पंचारती तबकात काकडे उडिदाच्या पीठात बसविण्याचे काम मेस्त्री कुटुंबिय करतात.
  50. सिंह रंगवणे गायमुख रंगवणे हे काम देवळी मंडळी करतात.
  51. श्रींची नवरात्रातील पुजेची भांडी घासणे तसेच श्रींच्या पंचारती ताटाला लागणारे उडीदाचे पीठ आणण्याचे काम पाटकर कुटुंबिय करतात.

वरीलपैकी श्रींचा पुजारी, आठ देवस्थानांचे (उपरोक्त उल्लेखानुसार) वहिवाटदार, मशाल, मृदंग, झांज, वाजंत्री या सेवा बारमाही आहेत.

पुराणिक, चोपदार, हुद्दा, मोरचिल, भोई, चौरी, अब्दागिर, हिलाल, छत्री, घाम पुसणे, शंख, निशाण, झेंडे या सेवा ज्या दिवशी पालखी चालू असते (चैत्र महिना, आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा आणि नवरात्र) त्या काळात चालू असतात. बाकी सर्व सेवा (बारमाही व अन्य) या केवळ नवरात्रोत्सवापुरत्या मर्यादित असतात. या सर्व सेवेक-याना नवरात्रोत्सवात त्यांच्या सेवेनुसार शिधा मिळतो.

वेबसाइटवर असणाऱ्या माहितीत काही त्रुटी किंवा कोणाचा उल्लेख राहिला असल्यास ते तात्काळ विश्वस्त मंडळाच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच कोणाचा नामोल्लेख करायचा राहून गेल्यास संस्थान दिलगीर आहे.

देणगी

भाविक आपल्या इच्छेनुसार 'पोस्टाने (मनीऑर्डरने)' देणगी देऊ शकतात.

यासाठी खालील पत्यावर मनिऑर्डर करावी.

मा. व्यवस्थापक,
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११

भाविक आपल्या इच्छेनुसार 'ऑनलाईन' पद्धतीने देणगी देऊ शकतात.

यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-

Account Name:
Shree Devi Bhagavati Sansthan Kotkamate.
Account No: 37600745201
Bank: State Bank of India
Branch: Talebazar
IFS Code: SBIN0016535.

स्टेट बँक ऑफ इंडिया
देणगीसाठी QR CODE

State Bank of India QR CODE

मंदिराकडे जाण्याचे मार्ग

जवळचे रेल्वे स्टेशन - १. नांदगाव     २. कणकवली

  1. मालवण आणि कणकवली पासून सुमारे ५५ किमी अंतरावर हे गाव आहे.
  2. मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून ३० किमी अंतरावर नारिंग्रे गाव आहे. या गावातून उजव्या बाजूस जाणारा रस्ता ५ किमी वरील कोटकामते गावात जातो.
  3. देवगड - जामसंडे - तळेबाजार - तिठा यामार्गे (अंतर अंदाजे २० किमी) कोटकामते गावात जाता येते.
मंदिराचा पत्ता

इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११

ई-मेल

devishreebhagwati@gmail.com

isdbhagwatikotkamate@gmail.com

   

जय जगदंबे आई भगवती गीत

गीतकार : श्री.मंगेश सिताराम मोंडे.

संगीतकार : श्री. प्रणव घाडी .

गायक :श्री. कमलाकर पाटकर

या वेबसाईटचे उद्घाटन आश्विन शु. ६,शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. सेनासरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे दहावे वंशज मा. सरखेल आर्यनराजे आंग्रे यांच्या शुभहस्ते झाले.

©2022 इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.   I   All Rights Reserved

Design, Developed & Donated By Mangesh Sitaram Monde, Mumbai (Kotkamate)